पाऊस आणि गोधडी....
पावसाची चाहूल लागताच सगळा आसमंत थोडा का होईना सुखावला आहे. प्रत्येक पावसाची प्रत्येकाची आठवण खूप वेग-वेगळी आहे. कोणाला पाऊस हवा-हवासा तर कोणाला नकोसा असा असतो. पण माझ्यासाठी पाऊस हा लहानपणापासूनच खूप आनंदाचा राहिला आहे. कारण याला आठवणींची जोड पण तशीच आहे. आजकालच्या लहान मुलांना गोधडी हा शब्द माहित नसेल पण ९०च्या दशकाच्या मुलांना हा शब्द नक्कीच माहित असेल. तसेच या गोधडीची उब आणि पाऊस हे कॉम्बिनेशन आजकालच्या बऱ्याच मुलांना माहीतही नाहीये. अशातच बाहेर गारवा देणारा धो-धो पाऊस आणि घरात गोधडी घेऊन झोपण्याची मज्जा काय औरच असते. आणि ही मज्जा अनुभवताना बरेच किस्से देखील या निम्मिताने आठवतात. यातला एक किस्सा एक जुनी आठवण आज मी तुमच्या समोर मांडतेय.
गोधडी हा शब्द जरी मला आता आठवला तरी डोळे पाणवतात आणि जुन्या आठवणींकडे कायम घेऊन जातात. आईची उबदार कुशी आणि आईच्या हाताने थंडी लागू नये म्हणून शिवलेली गोधडी अजूनही मनात घर करून कायम आहे. लहान असताना आईने पाळण्यात मावेल इतकी गोधडी तिच्या हाताने शिवली होती आणि आता मोठे झाले तरी आईने गोधडी बनवायचा तिचा छंद काही जून सोडला नाही. त्यामुळे गोधडी प्रेम अजून माझ्यासाठी तसेच आहे. तसेच हाताने शिवलेल्या या गोधडीची बरोबरी आताच्या ब्रँडेड चादरी करू शकत नाहीत.
पूर्वी गोधडी हा प्रकार बरीच मंडळी वापरायचे आणि या गोधडीची माया सुद्धा तशीच होती. आईने तिच्या हाताने सुईदोऱ्याच्या मदतीने खूप आठवणी मनात साठवत गोधडी शिवतअसायची. दिवसभराचा थकवा आणि थंडी पासून संरक्षण यासाठी गोधडी ही खूप जिवाभावाची गोष्ट होती. तसेच ही गोधडी कशी छान सुंदर आणि भरीव होईल याकडे आईचे बारीक लक्ष असायचे. यासाठी ती जुन्या चिंद्या ,जुने फाटलेले कपडे, तिच्या नक्षीकाम केलेल्या साड्या,बाबांचे सुती कपडे या सगळ्याचे एकत्रीकरण करून आईने आजपर्यत अनेक गोधड्या शिवल्या आहेत.
लहान असताना अंगावर गोधडी घेऊन जोपयाची एक वेगळीच मज्जा आता खूप काही आठवण करून देतेय. माझी शाळा सकाळची असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी 'नको' चा अलार्म हा रात्री पासूनच असायचा त्यात मऊमऊ गोधडी आणि आईची उबदार कुशी यामुळे शाळेत जावेसे वाटायचेच नाही. पण आई मात्र मायेने अंगावरची गोधडी बाजूला करायची आणि शाळेत जायचं चल उठ... ,उशीर होतोय असं म्हणत उठवायची. पण आईच्या या मायेच्या शब्दांचा तेव्हा खूप राग यायचा. कारण गोधडी मधलं रंगीत विश्वाने बहरलेलं जग एक वेगळीच दुनिया खूप काही आनंद देऊन जायचा. हा आनंद घेत असताना आई अचानक गोधडी बाजूला करायची आणि तेव्हा वैतागून मी,म्हणायचे अग, आई.... जोपू दे ना जरावेळ... पण आईची धडपड असायची ती म्हणजे मला शाळेत उशीर होता काम नये आणि माझी शाळा चुकता कामा नये. त्यासाठी तिचा हा ओरडा मला कायम असायचा.
आजच्या अनेक नवीन पिढीला गोधडीची उब मिळत तर नाहीच आणि गोधडी हा प्रकार आहे तरी काय हे देखील माहित नाही. पण मंडळी जर का तुम्हाला गोधडी हा प्रकार माहित असेल तर नक्की आपल्या प्रिय व्यक्तीला आणि आजच्या पिढीच्या लहान मुलांना अवश्य भेट करा. तसेच जर का कोणी गोधडी शिवत असेल तर त्यांच्या कडून नक्की उबदार गोधडी शिवून घ्या आणि ही आठवण एकदा तरी मनात कायमची साठवून बघा. आताच्या आधुनिक जगात गोधडीची ऊब सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी आहे. त्यामुळे मॉर्डन गोधडी विकत घेण्यापेक्षा एकदा तरी हाताने शिवलेली गोधडी वापरून बघा,खूप उबदार आठवणी गोळा करा आणि यंदाच्या पावसात तुमच्या य आठवणींना एक नवीन बहर द्या.
Written by: नम्रता तळेकर-ठाकूर....
Comments
Post a Comment